स्वप्नवत देह स्वप्नवत संसार । नाहीं पारावार दुःखा तेथें ॥१॥
काय त्याची गोडी लागसीसे मूढा । नाचतो माकोडा गारोड्याचा ॥२॥
स्त्री पुत्र धन कवणाचें तें आप्त । वायां भुललें चित्त म्हणें माझें ॥३॥
सावध होउनी गाये रामनाम । एका जनार्दनीं विश्राम तेणें तुज ॥४॥