मंत्रामाजीं मंत्र विठ्ठल त्रिअक्षरीं । जपतां निर्धारीं सुख होय ॥१॥
म्हणोनियां करा लागपाठ बळें । संसारीं अंधळे होऊं नका ॥२॥
संसारसागर भरला दुस्तर । विठ्ठल पैलपार नौका जगीं ॥३॥
तापत्रयें तापली भवार्णवीं पीडिली । तयां विठ्ठलवली प्रकाशली ॥४॥
जाणिवेचे डोहीं नको पडुं फेरे । विठ्ठल उच्चारें कार्यसिद्धि ॥५॥
एका जनार्दनीं विठ्ठलाची आण । दुजा तारी कोण मज सांगा ॥६॥