होई शरणागत भाकी रे करुणा । तरीच बंधना चुकशील ॥१॥
आपुलें तूं हित करूनियां घेई । सदा वाचे गाई रामनाम ॥२॥
जंववरी आहे इद्रियसंबंध । तोंवरी तूं बोध करी मना ॥३॥
एका जनार्दनीं मावळलिया दीप । सहजची खेप येईल बापा ॥४॥