कां रे नागविसी काळा । मानिसी संसार सोहळा । शेवटीं तो गळां । यमपाश पडतील ॥१॥
वाचे म्हणे रामनाम । आणीक नको दुजें काम । मोक्ष मुक्ति धाम । नामें एका जोडती ॥२॥
वाउगें जप तप कर्म । याचा न धरी संभ्रम । वाचे गाय सदा नाम । तेणें सर्व जोडतसे ॥३॥
एका जनार्दनीं नेमक । कायावाचा – मनें सप्रेम । वाचे सम्रतसे नाम । श्रीराम सर्वदा ॥४॥