डोळा न दिसे न्याहारी । दृष्टी जाली पाठीमोरी ॥१॥
अझुनी काइसा रे मोहो । मिथ्या विषयाचा संदेहो ॥२॥
कानीं बैसलीसे टाळी । आली यमाची उथाळी ॥३॥
अंग वाळलें कांचरी । चंद्रबिब चढलें शिरीं ॥४॥
शिश्न अंगुळी सांडुं मागें । मूत्री चोरपान्हा लागे ॥५॥
नाना विषयीं करी न सुखी । म्हणतां स्त्री प्रत्यक्ष थुंकी ॥६॥
वेश्या धन घेऊनि सांडी बोला । स्त्री वार्धक्यें घाली टोला ॥७॥
अग्नी आंचवल्या पोळी । पुत्र नाना स्नेह जाळी ॥८॥
लाळ सुटलीसे तोंडें । तरी खेळवी नातुंडें ॥९॥
मान कापुनी विषयावरी । मरण चढिलेंसें शरीरें ॥१०॥
बळ प्रौढीं स्त्रीनें धन । क्षीण जाल्या उदासीन ॥११॥
पाठी बैसविली आवडी । शेखीं नागउनी सोडी ॥१२॥
पुरुष वार्धक्य नावडे । मेल्या कानकेशा रडे ॥१३॥
दांत पडोनी सांगे गोष्टी । नाक लागतए हनुवटीं ॥१४॥
मोह ममता सांडीं काम । अखंड जपे रामराम ॥१५॥
रामनामें होइल हित । एर्हवीं बुडालें स्वहित ॥१६॥
एका जनार्दनीं पुरा । बालतारुण्य न रिघे जरा ॥१७॥