थोर गर्भीची यातना । आठवितां दुःख मना ॥१॥
नऊमास वैरी । पचे विष्ठेचें दाथरीं ॥२॥
जन्म होतांचि जननी । सुख मानी अनुदिनीं ॥३॥
बाळ वाढतसे सायासें । तों तों माउली संतोषे ॥४॥
तारूण्याच्या येतां भरा । मातेसी करी पाण उतारा ॥५॥
पावला सवें म्हातारपण । नाकीं तोंडीं लाळ जाण ॥६॥
नाठवेचि राम राम । एका जनार्दनीं तो अधम ॥७॥