साकरेची गोडी साकर सांडुनि उभी घडी । तैसें आयुष्य जोडिलें जोडी नरदेहा ॥१॥
मातियाचें आवदाणें घालिताती अंगीं । भोगावयालागीं विषयसुख ॥२॥
गेलें गेलें बापा हित हातोहातीं । पुढें आली राती काळवंखी ॥३॥
आयुष्याच्या शेवटीं सुखाचिया गोष्टी । काळा नळा पोटीं पडसील बापा ॥४॥
सोलवी सुकृत भरूनियां मापा । विषयासाठीं पाहे पां लावितोसी ॥५॥
अमृत जोडोनि सायासी गळीं कां लावितोसी । घालूनि मत्स्यासी कवण काज ॥६॥
मिनली चिंतामणीची शिळा घोटिव चौबळा । कां रे नेउनी पायातळा रचितोसी ॥७॥
तेथें जें जें कांहीं चिंतिसी तें अधिकची पावसी । नरकासी चौपासी वाढविली ॥८॥
कल्पतरू देखोनि डोळां उभा राहुनी तया तळां । म्हणसी मर मर निर्फळा काय करूं ॥९॥
तेथें मर मर उच्चारिलें मरण अधिक जालें । तुझिया कल्पना केलें वैर तुज ॥१०॥
येवोनि ये जनीं जन्म उत्तम योगी । कां रे भजन नारायणीं चुकलासीं ॥११॥
जंववरी आयुष्य आहे तंववरी हिताची सोये । एका जनार्दनीं शरण जाये एकपणें ॥१२॥