गोकुळी गोपाळसवें खेळतसे देव । ऐक प्रेमभाव तयांचा तो ॥१॥
गोधनें राखणें उच्छिष्ट खादणें । कालाहि करणे यमुनेतीरी ॥२॥
सवंगडियांचे मेळी खेले वनमाळी । घोंगडी ते काळी हातीं काठी ॥३॥
त्रैलोक्यांच्या धनीं वाजवी मुरली । भुलवी गौळणी प्रेमभावें ॥४॥
घरोघरीं चोरी करितो आदरें । एका जनार्दनीं पुरे इच्छा त्यांची ॥५॥