पाया शोधोनियां बांधिताती घर । ऐसें या दुस्तर नरदेहीं ॥१॥
म्हणती पुत्र माझे नातु हें कलत्र । मिळती सर्व गोत्र तये ठाई ॥२॥
संपत्ति देखोनि गिवसिती तयासी । माझें माझें म्हणती रांडापोरें ॥३॥
चाले बरवा धंदा । बहिणी म्हणती दादा । आलिया दरिद्रबाधा पळुनी जाती ॥४॥
जनार्दनाचा एका करितसे विनंती । संतसंगें चित्तीं जीवीं धरा ॥५॥