मातेसी न मिळे खावयासी अन्न । बाईलेसी घाली नित्य मिष्टान्न ॥१॥
म्हणे बाईल माझी संसारी बहु । मातेनें मज बुडवलें बहु ॥२॥
मातेनें माझा संसार बुडविला । माझ्या बाइलेनें वाढविला ॥३॥
माता माझी अभागी करंटी । बाईल प्रत्यक्ष सभागी मोठी ॥४॥
एका जनार्दनीं बाइलेआधीन जाहला । मातेसी अबोला धरिला तेणें ॥५॥