नीच कामें न धरी लाज । धांवें देखोनि भक्तांचे काज ।
ऐसा सांवळां चतुर्भुज । रुप धरी गोजिरें ॥१॥
उच्छिष्ट गोपाळांचे खाये । वळत्या त्यांचे देणे आहे ।
राखुनी गोधनें माय । मागें मागें हिंडतसे ॥२॥
काला करी यमुनेतीरीं । स्वयें वाटितो शिदोरी ।
उच्छिषाटाचि भारी । हाव अंगें स्वीकारी ॥३॥
ऐसा कृपेचा कोंवळा । उभा यमुनेचे पाबळा ।
एका जनार्दनी लीळा । अगम्य ब्रह्मादिकां ॥४॥