लाहे लाहे सोडीत गोधनें । भोंवतें गोपाळ वेष्टित तारांगणें ।
शोभला तो बाळवेषें परिपुर्ण । वेधु लाविला आम्हांसी तेणें वो ॥१॥
छंदे छंदें वाजवितो वेणु । आमुचा गुंतला तेथे जीवप्राणू ।
नाठवे दुजा हेत कांहीं आनु । तो हा नंदनंदुनु यशोदचा ॥२॥
खेळे खेळे यमुनेचे तटीं । सुकुमार सांवळा जगजेठी ।
खांदा घोगडें शोभे हातीं काठी । गोपाळांसी वळत्या दे सये घाली मिठी ॥३॥
एका जनार्दनीं कळंबातळीं । मिळोनियां गोपाळमंडळीं ।
काला मांडियेला मिळोनि सकळीं । लाहे लाहे वाटी शिदोरी ॥४॥