मृगजळाच्या पुरीं गुंतशीं पामरा । कोण तुज निर्धारा सोडविल ॥१॥
पडशी पतनी चौर्यायंशीं आवर्ती । तेव्हा तुझी गती कैशी होय ॥२॥
जीवीं जीवपण शिवीं शीवपण । वेगळें तें जाण दोन्हीं होती ॥३॥
यातना अनंत तुज भोगविती । तेथें काकुळती कोणा येशी ॥४॥
यमाचे ते दूत मारिती पामरा । कां रे संसारा न चुकशी ॥५॥
एका जनार्दनीं सांगतो विचार । रामनामें परिकर जप करी ॥६॥