कलत्रपुत्रबाधा अभिमानाची । तेही त्याजिल्या शेखी त्यागी म्हणे निजाची ॥१॥
अभिमान कैसेनि सरे। ही कृपा कीजे माहेरें दातारा ॥२॥
देही देहातीत प्रतिपादिजे ज्ञान । तेणेंचि ज्ञान देही येतुसे अभिमान ॥३॥
जें जें होय रुतें तें अहंकारु । त्यागी भोगी होय दिंगबरु ॥४॥
ब्रह्माज्ञानें म्हणती अभिमानाची तुटी । सोऽहं सोऽहं म्हणोनी तेथेंही लागे पाठीं ॥५॥
द्वैत नाहीं जगीं मीच येकला येकु । येणें स्फुरणें आला अभिमान घातकु ॥६॥
अति सुक्ष्म अभिमान कवणा न पडे ठाईं । देहातीत ज्ञानी म्हणती जो विदेही ॥७॥
एका जनार्दनीं जगद्गुरु न्याहाळी । गौखुर वंदितां अभिमानाची धुळी ॥८॥