विषयाचे अभिलाषे सबळ भेदु भासे । विषयलेषु तेथें मुक्ति केवीं वसे ॥१॥
विषयतृष्णा सांडी मग तूं साधन मांडी । वैराग्याची गोडी गुरुसी पुसे ॥२॥
स्त्रीपुरुष भावना भेदु भासे मना । तेथें ब्रह्माज्ञाना गमन कैंचें ॥३॥
कणुभरित जो डोळा शरीरासी दे दुःख । अणुमात्र विषय तो संसारदायक ॥४॥
शुद्धभाव तें वैराग्य आवडे । अति विषय विषयाधीन ते किडे ॥५॥
एका जनार्दनीं निजज्ञानशक्ति । निर्विषय मन ते अभेद भक्ति ॥६॥