सांवळा श्रीकृष्ण राखितो गाई । वेधियलें मन आमुचें तें पायीं ॥१॥
नवल लाघव न कळे ब्रह्मादिकां । वेदश्रुतीं शिणल्या ठक पडलें सकळिकां ॥२॥
साही दरुशनें वेडावलीं जयासाठीं । खांदी घेऊनी कांबळा गोधन राखी जगजेठी ॥३॥
एका जनार्दनीं ब्रह्मा गोकुळीं उघडें । पाहतां चित्त तेथें वेधलें ॥४॥