करितां हरिकथा श्रवण । स्वेद रोमांच नये दारुण । रुका वेचितां प्राण । जाऊं पाहें ॥१॥
द्रव्यदारा लोभ अंतरीं । हरिकथा वरी वरी । बीज अग्नीमाझारीं । विरुढें कैसें ॥२॥
टाळी लावूनियां जाण । दृढ घालिती आसन । अंतरी तो ध्यान । वल्लभेचें ॥३॥
धनलोभाचा वोणवा । तेथें जाळिलें जीवभावा । हरिकथेचा करी हेवा । लोकारुढी ॥४॥
धनलोभी आसक्तता । हरिकथा करी वृथा । तयासी तो परमार्थ तत्त्वतां । न घडे जाणा ॥५॥
एकलीच कांता । नाश करी परमार्था । तेथें धनलोभ येतां । अनर्थचि होय ॥६॥
एका जनर्दनीं । काम क्रोध लोभ तिन्हीं । द्रव्यदारा त्यजोनी । नित्य तो मुक्त ॥७॥