दीनाचें उपार्जन करी पोटासाठीं । म्हणे मज लंगोटी द्याहो कोण्हीं ॥१॥
घेउनी संन्यास हिंडे दारोदारी । ‘ नारायण ‘ करी पोटासाठी ॥२॥
काम क्रोध वैरी सदोदित पीडी । वरी शेंडी बोडी करुनीं काई ॥३॥
व्यर्थ विटंबना करिती जनांत । संन्याशाची मात सोंग दावी ॥४॥
एका जनार्दनीं संन्यास साचा । रामनाम वाचा उच्चार करी ॥५॥