आलों ऐकोनी खंडोबाची थोरी । वाघा होऊनि मज मागा म्हणती वारी ॥१॥
ठकलों ठकलों वाउगा सीण । वारी मागतां पोट न भरे जाण ॥२॥
सदा वागवी कोटंबा आणि झेंडा । रांडापोरें त्यजिलीं जालों काळतोंडा ॥३॥
गेले दोनी ठाव आतां कोठें उरला वाव । एका जनार्दनीं भेटवा मज पंढरीरावो ॥४॥