नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति सांगुं आतां ॥१॥
एक एक नाम घेतां प्रातःकाळीं । पापा होय होळी क्षणमात्रें ॥२॥
श्रवणें परीक्षिती तरला भूपति । सात दिवसां मुक्ति जाली तया ॥३॥
महाभागवत श्रवण करुनी । सर्वागाचें काम केलें तेणें ॥४॥
श्रीशुक आपण करूनी कीर्तन । उद्धरिला जाण परिक्षिती ॥५॥
हरिनाम घोषें गर्जें तो प्रल्हाद । स्वानंदें प्रबोध जाला त्यासी ॥६॥
स्तंभी अवतार हरि प्रगटला । दैत्य विदारिला तयालागीं ॥७॥
पायाचा महिमा स्वयें जाणे रमा । प्रिय प्ररुषोत्तमा । जाली तेणें ॥८॥
हरि पदांबुज सुकुमार कोवळें । तेथें करकमळें अखंडित ॥९॥
गाईचिया मागें श्रीकृष्ण पाउलें । अक्रुरें घातलें दंडवत ॥१०॥
करुनी वंदन घाली लोटांगण । स्वानंदें निमग्न जाला तेणें ॥११॥
दास्यत्व मारुती अचें देहास्थिती । सीताशुद्धि कीर्ति केले तेणें ॥१२॥
सेव्य सेवक भाव जाणें तो मारुती । स्वामी सीतापती संतोषला ॥१३॥
सख्यत्व स्वजाति सोयरा श्रीपति । सर्वभावें प्रीति अर्जुनासी ॥१४॥
उपदेशिली गीता सुखीं केलें पार्थां । जन्ममरण वार्ता खुंटविली ॥१५॥
आत्मानिवेदन करूनियां बळीं । जाला वनमाळी द्वारपाळ ॥१६॥
औट पाऊल भूमी घेऊनी दान । याचक आपण स्वयें जाला ॥१७॥
नवविधाभक्ति नवजणें केली । पूर्ण प्राप्ती जाली तयालागीं ॥१८॥
एका जनार्दनीं आत्मनिवेदन । भक्ति दुजेंपण उरलें नाहीं ॥१९॥