मूळची एक सांगतों खूण । एक आधीं मग दोन । तयापासाव चार तीन । व्यापिलें पांचें परिपूर्णं ॥१॥
तें भरुनी असें उरलें । सर्वां ठायीं व्यापियलें । जळीं स्थळीं सर्व भरलें । शेंखीं पाहतां नाहीं उरलें ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान । हेचि जाणती प्रेमखुण । समाधी पावलें समाधान । नाहीं उरलें भिन्नाभिन्न ॥३॥
शरण एका जनार्दनीं । खुण बाणलीं निजमनीं । व्यापक दिसे तिहीं त्रिभुवनीं । गेला देहभाव विसरुनी ॥४॥