वृक्ष पाहतां परतला आगम । निगमा न कळे दुर्गम ।
वेदशास्त्रांसी निरुतें वर्म । तो वृक्ष देखिला विठ्ठलनाम ॥१॥
माझें सोपें कोंडें । कान्होबा करीं तुं निवाडे ।
अर्थ सखोल ब्रह्मांड । भक्तिभाव तयासि उघडे रे ॥२॥
साहांसी येथें न चाले मती । चार गुंतलें न कळे गती ।
अठरा भाटीव वर्णिती । ऐशियासी न कळे स्थिति रे ॥३॥
चौर्‍यांयशीं लक्ष भुलले वायां । अठ्ठ्यायंशीं सहस्त्र भोगिता छाया ।
तेहतीस कोटी न कळे आयतया । एक जनार्दनीं लागे पायां रे ॥४॥