गोपाळ म्हणती कान्हा । सांभाळीं आपुल्या गोधळा ।
पळतां सैराट धांवती राना । गेल्या ठेल्या त्या तुम्हीं जाणां ॥१॥
कान्होबा पुरे पुरे तुझी गडी । आम्हा गाईनें केली ओढाओढी ॥धृ॥
तूं बैससी टेकावरी । आम्हीं श्रमतों वेरझारीं ।
ऐसें कैसें तुझें मुरारी । आपुलीं गोधनें जतन करीं ॥२॥
तुझ्या न लगती आम्हां गाई । तुझी संगती पुरे भाई ।
जरी कोपेल तुझी आई । तरी करील आमचें काई रे ॥३॥
तुझी गोधनें सैराटें । दाहीं पळतां दाही वाटे ।
वळितां कष्ट होताती मोठे । ठेचा लागुनी फुटली । बोटें ॥४॥
पैल श्रवणीं पाहे गाये । ते साद होये तिकडे जाये ।
उभी क्षणभरीं न राहे । वळितां जाती आमुचे पाय ॥५॥
पैल सावळीं डोळे सुटी । देखोनि धांवे हिरवटी ।
वळीतां धाप न साहे पोटीं । ती तु सांभाळी जगजेठी ॥६॥
पैले हुंगी कैसा सुजाण । स्वाद घे परी न खाये तृण ।
इसी हिंडवया थोडकें रान । वळीतां जाती आमुचे प्राण ॥७॥
पैल चोरटी रसाळ रंगी । कळप सांडोनी वाढे वेगीं ।
वळितां न वळे ती आम्हालांगीं । तुझी संगत नको वेंगीं ॥८॥
पैल सर्वांग सुकुमार मोठी । चहूंकडे ती धांवत खोटीं ।
मऊ रान देखोनियां अंग लोटी । तिसी वळितं जालों हिंपुटी ॥९॥
पैल लोभिष्ट हुंबरे कैशी । उगा न राहे हुंबरे द्वेषी ।
वळीतसं न वळे ती आम्हांसी । ती तु सांभाळी हृषीकेशी ॥१०॥
पैल हाताळ वोढाळ येकी । तेणे पाते गुड हाकी ।
ऐशी खट्याळ नाहीं आणिका । वळितां वळित्या घेती निकी ॥११॥
पैल पाय करिती भारी । उभी न राहे क्षणभरीं ।
वळतां शिणलों बहु मुरारी । तें तुं आपुलें जतन करीं ॥१२॥
पैल पोटफुगी खादाड । कैशी खाउनी हागे बाड ।
धुतां कधींच नव्हे धड । तुझीं गोधने न लगती गोड ॥१३॥
पैल मुतरीं मुंजी लांडी । कैशी सांचलीं घेत होडी ।
धांवे जेथें गोड लागे तोंडीं । वळतां पडती आमुची मुरकुंडी ॥१४॥
पैल मनमोहन सुंदर । कोणें काळी नव्हें स्थिर ।
इसी हिंदावया थोर वावर । हांव धरुनी धावती फार ॥१५॥
ऐसी गोधनें आमुच्या माथां । घालूं पहातोसी अनंता ।
एका जनार्दनीं विनवितं कृपा आली आलिंगी निजभक्ता ॥१६॥