कान्होबा नवल सांगतों गोष्टी । एक वृक्ष दृष्टी देखिला तयावरी सृष्टी ॥१॥
कोडें रे कोडें कान्होबा तुझें कोडें । जाणती जाणती अर्थ पाहतां उघडें ॥ध्रृ०॥
वृक्षाग्री नाहीं मूळ वर शेंडा नाहीं सरळ । बावन शाखा पल्लव पत्र पुष्प भरलें सकळ ॥२॥
एका जनार्दनींक वृक्ष सुढाळ । तयांवरी खेळे एक एकुलतें बाळ ॥३॥