चक्षुदर्पणीं जग हें पहा । जगज्जीवनीं मुरुनी रहा ।
तूर्या कालिंदि तीर्थीं नाहा । पापपुण्यासी तिळांजुळीं वहा ॥१॥
डोळ्यांनों सत्य ही गुरूची खूण । आपुलें स्वरूप घ्या ओळखून ॥ध्रु०॥
तिन्हीं अवस्था सांडुनी मांगें । अर्ध चंद्राचा चांदण्यांत वागे ।
चांदणें ग्रासुनी त्या ठायीं जागे । गड उन्मनी झडकरी वेगें ॥२॥
एवढें ब्रह्मांडफळ ज्या देठी । तें आटलें देखण्याचें पोटीं ।
त्यासी पहातां पाठीं ना पोटीं । मीतूंपणांची पडली तुटी ॥३॥
चहूं शून्याचा निरसी जेणें । शून्य नाहीं तें शून्यपणें ।
शुन्यातीतचि स्वयंभ होणें । शून्य गाळूनि निःशून्यपणें ॥४॥
चार सहा दहा बारा सोळा । ह्मा तो आटल्या देखण्याच्या कळा ।
कळातीत स्वयंभ निराळा । एका जनार्दनीं सर्वांग डोळा ॥५॥