खेळतां सांवळा गडियांसी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणें ॥१॥
आपुलाल्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणें खेळ सांडावया भाई ॥२॥
धांवती संवगडी पाठोंपाठ लवलाह्मा । गुंतल्या त्या गाई वळती न येती वळाया ॥३॥
येवोनि दीन मुख करिती हरिपुढें । एका जनार्दनीं तया पाहतां प्रेम चढें ॥४॥