अविवेकें देखा नवल केलें । अभिमानें कैसें लग्न लाविलें ॥१॥
गुणाची नोवरी अवगुणाचा नोवरा । सख्या सहोदरा लग्न केलें ॥२॥
पांचें सुरवाडी सासुरवाडी ये । अकल्पीचे शेजे निजलिये ॥३॥
अंगसंगेविण संतती जाहली । आब्रह्म कैसी तात्काळ व्याली ॥४॥
गुणाचेनि बळें वरसोनी पोटें । घरोघरीं भेटी नेत असे ॥५॥
सत्कर्म विवेकु पोटासी आला । तेणें जागविला आपुला व्याला ॥६॥
उठोनियां वरु संतती खाये । नोवरीसहित गेली माये ॥७॥
पितामहाचा पिता सुभानुतेजें । एका जनार्दनीं न दिजे दुजें ॥८॥