मानसींच ध्यान मानसींच स्नान । मानसींच अर्चन करुं आम्हीं ॥१॥
न करुं साधन लौकिकापुरतें । न पुजूं दैवत आन वायां ॥२॥
मानसेंच तप मानसेंच जप । मानसीं पुण्यपाप नाहीं आम्हां ॥३॥
मानसीं तीर्थयात्रा मानसीं अनुष्ठान । मानसें धरूं ध्यान जनार्दन ॥४॥
एका जनार्दनीं मानसी समाधी । सहज तेणें उपाधि निरसली ॥५॥