पाहुनियां हरी गोपाळांचे चोज । म्हणे येणें तो निर्वाणीचें निज मांडियले ॥१॥
मेठा खुंटीं येउनी हुंबरी घालिती । खर तोंडाप्रती येती जाहली ॥२॥
कळवळला देव जाहालासे घाबरा । मुरली अधरा लावियेली ॥३॥
मुरलीस्वरे चराचरी नाद तो भरला । तेणें स्थिर झाला पवनवेंगीं ॥४॥
यमुनाहि शांत झाली तेच क्षणीं । म्हणे चक्रपाणी सावध व्हा रे ॥५॥
पेंदीयानें तो शब्द ऐकिला कानीं । एका जनार्दनीं स्थिर झाला ॥६॥