आजी कांहो कृष्ण वर्जिली यमुना ।बाऊ तो जाणा कोठोनि आला ॥१॥
कैसा आहे बाहु पाहिन तयातें । म्हणोनि त्वरित उठिलासे ॥२॥
वारितां वारितां पेंदा पै गेला । पहातसे उगला यमुनेंत ॥३॥
बाऊ तो न दिसे कोठें खल्लाळ वाजत । पेंदा तया म्हणत क्रोधयुक्त ॥४॥
म्हणतसे पेंदा यमुनेसी जाण । स्त्री तूं होऊन हुंबरी घेसी ॥५॥
मी कृष्णदास घेसी तुं हुबरी । तुज निर्धारी बळ बहु ॥६॥
मी काय निर्बळ घेसी तुं हुबरी । आतांची निर्धारी पाहें माझें ॥७॥
म्हणोनियां पेंदा तेथेंची बैसला । हुबरीं तो तयाला घालीतसे ॥८॥
पेंदा कां नये काय जाहलें त्याला । कृष्णें पाठविला दुजा एक ॥९॥
तोही मीनला तयांसी तत्काळ । गडी तों सकळ आलें तेथें ॥१०॥
उरलेसे दोघे कृष्ण आणि राम । गुंतलें सकाम गडी तेथें ॥११॥
काय जाहलें म्हणोनि आले उभयंता । पाहुनी तत्त्वतां हांसताती ॥१२॥
सावध करितां न होती सावध । लागलासे छंद घुमरीचा ॥१३॥
एका जनार्दनीं कौतुकें कान्हया । आली असे दया भक्तांची ते ॥१४॥