गोविंयेंलें देवें आम्हांसी अभिमानें । नामरुप पेणें अंतरलों ॥१॥
करिती विचार इंद्रादी देव । हें सुखवैभव न मिळे आम्हां ॥२॥
शेष उष्टावळी मिळतां आम्हांसी । पावन जन्मासी होऊं आम्ही ॥३॥
ऐसा विचार करुनियां देव । मत्स्यरुप सर्व धरिताती ॥४॥
गोपाळासी सांगे वैकुंठीचा रावो । आजी नवलावो तुम्ही करा ॥५॥
कवळ खाउनी हात टिरी पुसा । यमुनें सहसा जाऊं नका ॥६॥
कां तो सांगे हरी न कळे तयासीं । एका जनार्दनासी गुज पुसे ॥७॥