साधन कांहीं नेणें मी अबळा । शाम हें रूप बैसलेंसे डोळां ।
लोपली चंद्रसुर्याची कळा । तो माझा राम जीवांचा जिव्हाळा ॥१॥
राम हें माझें जीवींचे जीवन । पाहतां मन हें माझें उन्मन ॥२॥
प्रकाश दाटला दाही दिशा । पुढेंही मार्ग न दिसे आकाशा ।
खुंटली गति श्वासोच्छ्‌‍वासा । तो राम माझा भेटेल हो कैसा ॥३॥
यासी साच हो परिसा कारण । एका जनार्दनीं शरण ।
त्याची कृपा होय परिपूर्ण । तरीच साधें हें साधन ॥४॥