स्मरण स्वयाती नलगे ती जपमाळ हातीं । नाठवितां चित्तीं स्मरण होय ॥१॥
तैसा देहीं देवो परिसुनीं भावो । नाठव तोचि आठवो होत असे ॥२॥
वस्तु वस्तुपणें जडोनि गेली अंगीं । आठवू तो विसरु वेगीं जाला वावो ॥३॥
अगाध डोहीं गगन बुडालें दिसे । परि न बुडतांचि असे गगनी गगन ॥४॥
तैसा देहीं देह असतांचि संचला । म्हणती हारपला लाज नाहीं ॥५॥
मृगजळाचि व्यक्ति जळपणाची प्रतीति । भासत असतां स्थिति मिथ्या जैसी ॥६॥
एका जनार्दनीं एकपणें निर्वाही । असतांचि देह वावो देहपणें ॥७॥