मी मी म्हणतां अवघें मी जालों । तूंपणाचा बोला लाजूनियां ठेलों ॥१॥
मी ना कोणाचा ना माझें कोणी । एकुविण एकु सहज निर्वाणीं ॥२॥
माझें मीपण मजमाजीं निमालें । एकोनेक सकळ सहजीं सहज जालें ॥३॥
एकाजनार्दनीं गणीत नवानी येकु । परापरते सारुनी उगला सिध्दांतु ॥४॥