आम्हां येणें न जाणें जिणें ना मरणें । करणें ना भोगणें पापपुण्य ॥१॥
जैसें असों तैसे आपोआप प्रकाशों । कवणा न दिसों ब्रह्मादिकां ॥२॥
नवल नवल सांगती सखोल । अनुभवीं हे बोल जाणताती ॥३॥
आम्हां कवण पदा जाणें ना कवण देवा भेटणें । आप आपणांमाजीं राहणें अखंडीत ॥४॥
सत्य कैलास वकुंठ हे आम्हां माजी होती जाती । या सकळां विश्रांती आमुच्या रुपीं ॥५॥
चंद्र सुर्य तारा हा पंचभौतिक पसारा । आम्हांमाजीं खरा होत जात ॥६॥
इतुकें दिधलें आम्हांक गुरुजनार्दनीं । एक जनार्दनीं । एका जनार्दनीं व्यापियेला ॥७॥