मिळोनि गोपाळ सकळीं । यमुनेतटीं खेळे चेंडुफळीं ।
गाई बैसविल्या कळंबातळीं । जाहली दुपारीं खेळतां ॥१॥
काला मांडिला वो काला मांडिला वो । नवलक्ष मिळोनी काला मांडिला वो ॥धृ॥
नानापरींचे शोभती दहीभात । पंक्ती बैसविल्या पेंदा बोबडा वाढीत ।
जो जया संकल्प तें तया मिळत । अनाधिकारिया तेथें कोणी न पुसत ॥२॥
पुर्वसंचित खालीं पत्रावळी । वाढती भक्तिभावाची पुरणपोळी ।
नामस्मरणाची क्षुधा पोटीं आगळीं । तेणें तृप्ती होय सहजीं सकळीं ॥३॥
ऐसे तृइप्त जाहले परमानंदें । कवळ कवळाचे निजछंदें ।
एक जनार्दनीं अभेदं । शुद्ध समाधिबोधें मुखसंवादें ॥४॥