आकाशापासोनी वायु झाला । तो गगनावेगळा नाहीं गेला ॥१॥
अग्नीपासुनी जळाचा अंशु । जळापासुनी पृथ्वीप्रकाशु ॥२॥
तैसें कार्य आणि कारण । परस्परें अभिन्न जाण ॥३॥
जेवीं तंतु आणि पटु । दोन्हीं दिसती एकवटु ॥४॥
साखरेचे नारळ केले । परि साखरत्व नाहीं मुकले ॥५॥
जेवीं कां पृथ्वीमृत्तिका । मृत्तिकेंचें भांडें देखा ॥६॥
ऐसें कार्यकारण विशेष । एका जनार्दनीं निज दास ॥७॥