नग घडतां सोनें साचें । न घडतां सोनें पण न वचे ॥१॥
मेघापुर्वी शुद्ध गगन । मेघ सबाह्म गगनीं जाण ॥२॥
कुल्लाळ जें भांडें घडीत । त्यासी मृत्तिका नित्य व्याप्त ॥३॥
सागरीं जें जें उपजे लहरी । तैसा व्यापक श्रीहरीं ॥४॥
जन तोचि जनार्दन । एका जनार्दन व्यापक पूर्ण ॥५॥