भगवद्भाव सर्वांभुतीं । हेंचि ज्ञान हेंचि भक्ति । विवेक विरक्ति । याचि नावें ॥१॥
हें सांडुनीं विषयध्यान । तेंचि मुख्यत्वें अज्ञान । जीवींजीवा बंधन । येनेंचि दृढ ॥२॥
आठव तो परब्रह्मा । नाठव तो भवभ्रम । दोहींचें निजवर्म । जाण बापा ॥३॥
आठव विसर चित्तीं । जेणें जाणिजेती । तेचि एक निश्चिती । निजरुप ॥४॥
स्मरण तेचि निजमुक्ति । विस्मरण तेचि अधोगति । ऐसें पुराणें गर्जती । बाह्मा उभारुनी ॥५॥
एका जनार्दनीं । सहज निजबोध मनीं । सबाह्माभ्यंतरीं । पूर्ण परमानंद ॥६॥