मी ब्रह्मा जाहलों म्हणें अंतरीं ब्रह्मा नव्हें ऐसें कांहीं । ब्रह्माविण अनु न दिसे कोठें । तितुकें ब्रह्मा पाहीं ॥१॥
होय नाहीं ऐसा संशयचि नाहीं निश्चयेंसी तेंचि आहे । आहे तेंचि ब्रह्मा नाहीं तेंचि ब्रह्मा अवघेंचि ब्रह्मा पाहे ॥२॥
वर्णाश्रमधर्म साचार मानुनी यथाविधी आचरती । स्वमताचा देहीं अभिमान धरुनी पृथक पृथक वाद करिती ॥३॥
पाषांडाच्या बळें होताती तोडागळे भेदें साचि हें अम्हीं ना हो म्हणती । सर्वदा तरी ब्रह्मा आहे ऐसें न कळे तयाप्रती ॥४॥
जळेंशी लवण वेगळे नाहीं जाण । तैसें आदिमध्य अंतीं ब्रह्माचि असे तेथें कैंचें न्युन पूर्ण ॥५॥
कर्ता कार्य कर्म अभिन्न तेथें बद्ध आणि मुक्त कवण । एका जनार्दनीं ऐक्यपणें मुळींच नाहीं भिन्न ॥६॥