निरालंब सहज माय पहातां कैसें । सबाह्म अभ्यंतर व्यापुनी पुर्ण अखंड दिसे ।
लक्ष वो अलक्ष पाहतां देहीं देह न दिसे । निर्गुण गुणसी आलें अवघें ब्रह्माचि दिसें ॥१॥
ऐसा हा व्यापकु हरि आहे सर्वांठायीं । ज्ञानांजन लेऊनि पाहे देहींच्या देहीं ॥धृ०॥
पिंड ब्रह्मांड व्यापुनी अतीत कैसा । आदि अंत ज्याचा न कळे श्रुति मुरडल्या कैशा ।
नेति नेति शब्द बोलती हरि अगाध ऐसा । म्हणवोनि गुरुमुखें दृढ विश्वास धरीं ऐसा ॥२॥
प्रसिद्ध आत्मा देखोनि विरालें मन । मनचि उन्मन जालें तेथें कैचें ज्ञान ।
ज्ञान ध्यान हेंहि न कळें अवघा जनार्दन । एका जनार्दनीं शरण । कायावाचामनें जाण ॥३॥