ऐसें हें वचन ऐकोन । श्रीतीं केलासे प्रश्न । कैसें अपरोक्ष ज्ञान । सांगा मज ॥१॥
हा शब्द अलोलिक । श्रवणीं झालें सुख । मग जनार्दनाचा रंक । बोलता झाला ॥२॥
पंचभुतें तिन्हीं गुण । स्थुल सुक्ष्म कारण । हें अपरोक्ष अज्ञान । पंचीकरण ॥३॥
यासी तो जाणता साक्षित्वे देखतां । तोचि अपरोक्ष ज्ञाता । जाणावा पैं ॥४॥
सोहमाचा साक्षात्कार । एक जनार्दनीं निवडोनि साचार । वस्तुंचें घर । दाखविलें ॥५॥