भावें करितां माझी भक्ति । विषयवासना जळोनि जाती ॥१॥
चालतां माझे भक्तिपंथीं । सकळ साधनें जळोनि जातीं ॥२॥
माझिया निजभक्ता । न बाधेचि संसारव्यथा ॥३॥
प्रल्हादा गांजिता जगजेठी । मी प्रगटलों कोरडे काष्टीं ॥४॥
द्रौपदीं गांजिती तात्काळीं । कौरवांची तोंडे केली काळीं ॥५॥
गोकुळीं गांजितीं सुरपती । गोवर्धन धरिला हातीं ॥६॥
अर्जुन प्रतिज्ञेचे वेळीं । म्यां लपविला हेळीं ॥७॥
अंबऋषीचे गर्भवास । म्या सोशिलें सावकाश ॥८॥
भक्तचरणींची माती । एका जनार्दनीं वंदिती ॥९॥