माझा शरणागत न दिसे केविलवाणा । ही तो लाज जाणा माझी मज ॥१॥
एकविध भावें आलिया शरण । कर्म धर्म जाण पूर्ण त्याचें ॥२॥
समर्थाचे मुला काय खावयाची चिंता । तैसें मी त्या तत्त्वतां न विसंबें ॥३॥
एका जनार्दनीं हा माझा नेम । आणीक नाहीं वर्म भावेंविण ॥४॥