भाव भजनातें निपजवी । भक्त देवातें उपजवी ॥१॥
आतां भजनीं देव केला । भक्त वडील देव धाकुला ॥२॥
सेवा करणें हा संकल्प । भक्त देवाचाही बाप ॥३॥
भक्ता कळवळा देवाचा । देव झाला त्या भक्तांचा ॥४॥
देव भक्तांचे पोटीं । झाला म्हणोनी आवड मोठी ॥५॥
एका जनार्दनीं नवलाव । कैसा भक्तचि झाला देव ॥६॥