भक्तीच्या पोटा मुक्ति पैं आली । भक्तीनें मुक्तीतें वाढविलें ॥१॥
भक्ति ते माता भक्ति ते दुहिता । जाणोनि तत्त्वतां भजन करी ॥२॥
भक्ती सोडोनि मुक्ति वांछिती वेडी । गुळ सोडोनी कैसी जे गोडी ॥३॥
संतोषोनी भक्ति ज्यासी दे मुक्ति । तोचि लाभे येर व्यर्थ कां शिणती ॥४॥
एका जनार्दनीं एक भाव खरा । भक्ति मुक्ति दाटुनी आलिया घरा ॥५॥