अवघे ते दैवाचे । विठ्ठल विठ्ठल वदती वाचे ॥१॥
अवघा धंदा दुजा नाहीं । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥
अवघा संसार करिती । वाचे अवघे विठ्ठल म्हणती ॥३॥
अवघीं कर्में घडलीं तया । अवघें विठ्ठलाचि पायां ॥४॥
अवघा एका जनार्दनीं । अवघा जनीं जनार्दनीं ॥५॥