कमळनेत्र पाहतां मन माझें भुललें । योगी ध्याती जयातें रूप पंढरीये आलें ॥१॥
आनंदु वो परमानंदु ध्यातां । समाधी उन्मनी वोवाळणी तत्त्वतां ॥२॥
योगयाग तप न लगे आचरण कांहीं । सुलभ सोपारा वसे सर्वांठायीं ॥३॥
वेदशास्त्र श्रमलें पुराणें भांडतीं । शेषादिकां न कळे कुंठित मती ॥४॥
एका जनार्दनीं पहात आनंदें मन । तद्रुपति झालें जनीं सर्व जनार्दन ॥५॥