सर्वसुखाची उघडली खाणी । श्रीमुख नयनीं पाहतां ॥१॥
मोक्षसुख आम्हां न लगे गा देवा । विश्रांतीसी ठेवा आणिकासी ॥२॥
धनसुख मज कासया हें पोटीं । पाहिजे लंगोटी सर्वभावें ॥३॥
स्त्रीसुख संसार कासया वेरझार । नको हा पसर मज देवा ॥४॥
एका जनार्दनीं नाशिवंत सुख । पाहतां तुझें मुख इच्छा पुरती ॥५॥