भ्रम धरुनियां वायां कासया खेळसी भोवरां । यम मारी कुच्चा फिरशील चौर्याशीं घरां ॥१॥
पुढे शुद्धी करीं वाचें स्मरे हरी । वायां भ्रमें फिरशी गरगरां पडसी मायाफेरी ॥२॥
एका वारी एक मारिताती घाय । दया नाही येत कोणाखाली न ठेविती पाय ॥३॥
एका शरण जनार्दनीं तरीच चुके फेरा । नाहींतरी फिरशी गरगरां ॥४॥
मेळवीं संवगंडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥
सांवळा सुंदरा वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥
मुगुट कुंडलें चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळां कौस्तुभमणी ॥३॥
एका जनार्दनीं वेधलेसे मन । नाहीं भेद भिन्न गौळनींसी ॥४॥